learning

Tuesday, March 21, 2017

बालोत्सव

बालकांची रंगपंचमी
   'बालोत्सव'

या कोवळ्या कळ्यामाजी
लपले ज्ञानेश्वर , रविंद्र , शिवाजी
विकसता प्रकटतील समाजी
शेकडो महापुरुष ॥
                      ग्रामगीतेतील या ओळीचा प्रत्यक्ष प्रत्यय काल दि .२० फेब्रुवारी २०१७ रोजी पं.स- गोंडपिंपरी येथील जि.प. प्राथमिक शाळा , चेकव्यंकटपूर या शाळेत आला. अतिशय उत्साहात व जल्लोषात बालोत्सवाचे आयोजन या शाळेत करण्यात आले होते . कदाचित बहुतेकांना   या शाळेचे नाव अपरिचीत असावे . परंतु या शाळेतील शिक्षक मात्र सर्वांना परिचीत आहेत . निखील तांबोळी ... या तंत्रस्नेही शिक्षकाची ही द्वीशिक्षकी शाळा ... शाळेत पटावर दहा विदयार्थी ... असे असतांनाही संकुचित वृत्ती न ठेवता संपूर्ण तालुक्याला सामावून एका उत्कृष्ट दर्जाच्या सोहळ्यास त्यांनी व त्यांचे मुख्याध्यापक आलाम सर यांनी पुर्णत्वास नेले . ही बाब विशेष अभिनंदनीय व अभिवंदनीय आहे .
            या कार्यक्रमाच्या पुर्णत्वाच्या सोहळ्यास अर्थात समारोपीय सत्रात मा. शरदचंद्र पाटील , प्राचार्य DIECPD  व गटशिक्षणाधिकारी, मा . उराडे सर , पं.स- गोंडपिंपरी, तसेच DIECPD येथील इंग्रजी विषयाचे प्रशिक्षक कु.कल्पना बन्सोड व कृतिका बुरघाटे उपस्थित होत्या . ' बालोत्सव ' कार्यक्रमाची वैशिष्टये -
O चेक व्यंकटपूर शाळेतील शिक्षकांनी केंद्रातील सर्व विदयार्थांना व तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील किमान तीन विदयार्थासाठी ही संधी उपलब्ध करून दिली होती .
O बालोत्सव मुलांसाठी खऱ्या अर्थाने रंगोत्सव ठरला .
O बालोत्सवाच्या सुरुवातीच्या सत्रात मुलांनी शाळेच्या भिंतीवर सुंदर व मोहक चित्र काढून शाळेच्या भिंती जिवंत केल्या .
Oसोबतच काही मुलांनी  कागदावर सुद्धा रेखाटनांची व रंगांची उधळण केली .
O ज्या मुलांना रंगामध्ये रस न०हता त्यांच्यासाठी कथेचे दालन होते . मुलांसाठी काही चिठ्ठया बाऊलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या . त्यातील कोणत्याही दोन किंवा तीन चिठ्ठया उचलून मुलांनी सुंदर कथा तयार केल्या .
O काही मुलांना कविता करायचे वेड होते . त्यांच्यासाठीही कवितेचे दालन मोकळे होते . मुलांनी एखादी हवी ती चिठ्ठी उचलायची किंवा त्यांना वाटेल त्या विषयावर कविता लिहायची .
O यापैकी कशातच आवड नसणाऱ्यांसाठी सुध्दा सोय होती . कागद आणि कात्री त्यांच्यासाठी मोकळी होती . काही मुलांनी त्याचा वापर करून कागदी मुखवटे तयार केलेत .
Oदिवसभरात मुलांना संपूर्ण स्वातंत्र्य होते . कुठलीही आडकाठी नाही , भिती नाही , धाक नाही , बंधन नाही .
Oसर्व बंधनातून मुक्त होवून मुले सैराट झाली होती . समारोप सुरू झाला तरी काही मुले आपल्याच तंद्रित , आपल्याच कामात व्यस्त होती .एकंदरित मुलांची मज्जाच मज्जा होती .
O विशेष म्हणजे गावकऱ्यांचा सहभाग या कार्यक्रमात प्रखर दिसून आला .
O गावकऱ्यांनी तालूक्यातून आलेल्या सर्व मुलांना जेवन दिले .
O गावातील एका प्रतिष्ठित नागरिक संजय वडस्कर यांनी व शाळेने तालुक्यातील सहभागी सर्व मुलांना चित्रकलेची वही व पेन भेट दिली .
Oकार्यक्रमात गावातील उत्कृष्ट पालकाचा सत्कार मा. शरदचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
Oकाही मुलांच्या उत्कृष्ट कथा व कवितांचे वाचन झाले .
O सदर कार्यक्रमात श्री. संजय माथनकर यांनी शैक्षणिक विडीओ शिक्षकांपर्यत सहज पोहचावे या हेतूने तयार केलेल्या DVD चे विमोचन करण्यात आले .
O कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखील तांबोळी यांची जीवनसंगीनी सौ . शुभांगी तांबोळी यांची मौलाची मदत झाली . त्यामुळे शुभांगीताईचे सुद्धा पाटील सरांच्या हस्ते सस्नेह भेट देवून कौतुक करण्यात आले .
O कार्यक्रमात कल्पना बन्सोड यांनी 'बालशिक्षणातील शास्त्रीयता ' या विषयावर थोडक्यात प्रकाश टाकला .
Oसोबतच कल्पना बन्सोड यांनी दोन हजार रुपये शाळेच्या कामासाठी मदत म्हणून दिले .
O गटशिक्षणाधिकारी मा .उराडे सर यांनी शिक्षकांचे व मुलांचे कौतुक केले तसेच शाळेला एक हजार रूपये देणगी दिली .
O मा . शरदचंद्र पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वानुभवातील काही अनुभव सांगत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात , सहज व सोप्या भाषेत सर्वांना शुभसंदेश दिला .
O प्रत्येकाने यातून शिकायला हवे , हा उपक्रम सर्वांनी स्विकारावा असे आवाहन पाटील सरांनी जिल्हयातील सर्व शिक्षकांसाठी केले .
O कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व तांबोळी दाम्पत्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती . त्यांच्या कामाचे कौतुक होत असतांना व मुलांचा प्रतिसाद बघतांना ....याचसाठी केला होता अट्टहास .. क्षण हा गोड व्हावा.. असे भाव शाळेतील दोन्ही शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते .
                   कार्यक्रमाच्या समारोपाचे सत्र संपले होते परंतु नवीन कार्यक्रमाची चाहूल सोबतच लागली होती. लगेच सहा वाजता या दोन शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने , तेथील तरुणाईचा सहभाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते . गावातील कलाकार , तरुण , विदयार्थी सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला होता . बघता बघता बारा वाजले . कार्यक्रम संपला . परंतु नवा दिवस नवी पालवी , नवी आस घेवून मोकळा श्वास घेण्याचा आस्वाद घेऊन आला आणि सहज मनात आले ....
झाला आजचा प्रकाश , जुना कालचा काळोख,
चांदण्याला किरणांचा सोनसळी आभिषेक,      
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास...
                                    शब्दांकन - कल्पना बन्सोड , प्रशिक्षक
                                        DIECPD, चंद्रपूर .
      

No comments:

Post a Comment