"मॅडम तुमी आमाले कवा भेटाले येताजी ? "
"अग लवकरच येणार आहे . "
"तसेच मनता तुमी नेमीच "
" मॅडम आमाला तुमची खूप खूप खूप खूप .......................... आठवण येते. "
"तुमीच आमाले पुना शिकवाले यानं . "
बोर्डा शाळेची जान्हवी , ऋतुजा ,नमो , सुहानी ही चिमुकली पाखरं सकाळी मला फोनवरून बोलत होती .
मी मुलांना विचारलं , "तुम्ही कुणाच्या फोनवरून बोलत आहात ? "
मुलं म्हणाली , " नमोच्या मामाचा फोन हाय . "
मी म्हटलं , " पैसे जास्त लागतील , मी इकडून फोन करते . थांबा "
मुलं म्हणाली , " नाई मॅडम . आम्ही मोबाईलमंदी पैसे भरलोत . "
मी विचारले , " कसे ? "
"आमी सर्वायनी एक -एक रुपये काढलो , अन् रिचार्ज केलो. "
केवळ मला बोलण्यासाठी मुलांची ही कळकळ मला कळवळून सोडणारी होती .लेकरांचा जिव्हाळा बघून मन भरून आलं. आपण आपल्या कामाच्या व्यापात सगळं विसरून जातो . शाळा सुटल्यापासून जिवंत अनुभवापासून मी मृत झाले . प्रशासकीय विभागात काम करतांना तो लेकरांच्या अनुभवविश्वातील तरतरीतपणा , टवटवीतपणा , सभोवताल जाणवतं नाही . काही नवीन शिकायला मिळत नाही . जीवनाचे रंग जवळून जगायला मिळत नाहीत . मी तर सर्व हरवून बसलेय . स्वतःच्या स्वार्थापोटी ... हळूहळू विसरत चाललेय...माझी मलाच ...पण मुलं ... ती कधीच विसरत नाहीत . आपलं वागणं , आपलं बोलणं , आपलं शिकवणं , एवढचं काय आपल्या जीवनातील महत्वाचे दिवसही त्यांना नेमके लक्षात राहतात . त्यासाठीच तर या सोनपर्यांनी मला फोन केला होता .
मला म्हणाल्या , " मैडम ३ एप्रिलले तुमची अनवरसरी आहे नं, आमाले माईत हाय . मनूनच तुमाले बोलवासाठी आमी फोन केला . मागच्या वर्सी आपण खूप मजा केलो नं तशी मजा करून याई वर्सी "
मागील वर्षी आम्ही आमचा लग्नाचा वाढदिवस या चिमुकल्यांसोबत साजरा केला . मुले ते विसरली नाहीत . त्यांना तारीख सुध्दा लक्षात राहिली हे मात्र नवलचं ...
"मी नक्की येणार " मुलांना मी आश्वासन दिले .
ऋतुजा म्हणाली , " मॅडम नक्की नक्की येजा , तुमाले आमची कसम हाय . "
नमो म्हणाली , " मॅडम तुमाले सुहानीची कसम हाय . "
हे ऐकून मी थोडावेळ विचारातच पडले . मुलांना स्वतःच माझ्या वागणूकीवरून ठरवलं असणार की, मी सुहानीवर जास्त प्रेम करते . नाहीतर नमो असे म्हणाली नसती .आपल्या लक्षातही येत नाही पण मुलं आपली प्रत्येक गोष्ट टिपत असतात . मला खरचं अपराध्यासारखं वाटलं . आपण नकळत मुलांवर किती अन्याय करतो ना .... तरीही हे निरागस , निरामय चेहरे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात . एवढी विचारांची खोली कुठून येत असेल बरं त्यांच्याकडे ... आचाराच्या उंचीवरच विचारांची खोली अवलंबून असते , नाही का ?
Saturday, March 25, 2017
प्रेमाची पर्वणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment